*महापूराचा जाहीर पंचनामा करताना...*
महापूराने झालेल्या नुकसानीचा
जाहीर पंचनामा करताना
माझ्या कवितेची खूपच घालमेल होते...
अचानक पूराचं पाणी...
आपल्या वाडी वस्तीत
किंवा घरात शिरावं...
आणि आपण क्षणार्धात बेघर व्हावं...!
ही कल्पनाच तिला असह्य होते...
मग नेसत्या वस्त्रानिशिच ती...
स्वत:च्या कल्पना ,प्रतिमा यांना उराशी धरून...
महापूराच्या भयंकर विळख्यातून
सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करते...
तेव्हा ती मला...
स्वत:चा जीव धोक्यात घालून
मुलाबाळांना वाचविणा-या आईसारखी...
किंवा वासरांसाठी दावे तोडून...
हंबरडा फोडणा-या गाई सारखी भासते...
आपल्याआकांतातून,आक्रोशातून ती सांगू इच्छिते...
मला ,तुम्हाला...प्रत्येक पूरग्रस्ताला...लोकप्रतिनिधीना...
"इथली व्यवस्था...इथले प्रशासन
अन् त्यांचे तथाकथित भाट सांगतात...
इतके साधे सोपे सरळ नाहीत मित्रानो...
या महापूराचे संदर्भ...
या प्रलंयकारी लाटांमागे दडल्या आहेत...
अनेक राक्षसी परियोजना...
विकासाच्या अमानवी कल्पना...!
त्यातून जन्मणा-या महानगरीय सुखाच्या
झगमगीत...माँल, पंचतारांकित हाँटेलच्या ...'स्मार्ट कल्पना...'
अन् फुटपाथवर आळंबीसारख्या उदभवणा-या...
झोपडपट्टीतल्या नरकयातना...
देशाच्या कर्जबाजारीपणाची लाजिरवाणी...मेंदूपोखरणारी धोरणं...
शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्यांची कारणं....
आणि...या सर्व पार्श्वभूमीवर चालणारा सत्ताधारी आणि विरोधकांचा भाडोत्री अभिनय...
आणि देश सुजलाम-सुफलाम बनविण्याच्या...मायावी घोषणा...!!
मित्रानो...ती सांगते आहे तुम्हाला
"याच पाण्याखाली, याच पाण्यासाठी...बुडवियली जाईल
तुमची आमची सुपीक शेती
पिढ्या पिढ्यांची आदिम भारतीय संस्कृती..
ढोल- तुता-या, शिंग - पाव-यांच्या तालावरची जंगलगाणी...
पशुपक्षांची व्रुक्षवेलींची देहभान विसरायला लावणारी मंजूळ वाणी...
तुमचा माझा गांव...निळे, हिरवे डोंगर...
मंदिरांचे घंटानाद...
पशुपक्षांची सुंदर घरटी...
त्यांचा चिमणचारा...
अन् त्यासोबतचं...
पर्यावरण प्रेमींच्या स्वप्नांसोबतच...
तुमच्या आमच्या हक्काचा निवारा...
मग हाती आपल्या उरेल काय?
भिकेचा कटोरा...???
ज्यात वाढली जातील
राजकिय संमोहनासोबत
पुर्नवसनाची बेगडी आश्वासनं...फक्त आश्वासनं...!!!
@प्रा. दिलीप सुतार
कुरूंदवाड
0 Comments