मडिलगे परिसरात मान्सूनपूर्व पेरणीची लगबग
संतोष मांडे
(भुदरगड प्रतिनिधी )
९४२०९३४०७६
गेल्या आठवड्यात तोक्ते चक्रीवादळामुळे झालेला पाऊस आणि पावसाने घेतलेली उसंत याचा लाभ शेतकरी घेत असून आता मडिलगे परिसर व भुदरगड तालुक्यात खरीप पिकांच्या पेरणीची लगबग सुरू आहे. मान्सून वेळेत होणार असल्याने बळीराजाची पेरणीची धांदल उडाली आहे. भुदरगड तालुका हा सह्याद्री घाटमाथ्यावर असून प्रचंड पाऊस या भागात पडतो त्यामुळे जास्त पावसामुळे भात हे पीक घेतले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात शेतात तापलेल्या मातीत भाताची धूळ वाफ पेरणी केली जाते. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर 20 मे पासून भात पीक पेरणीच्या धांदलीस सुरुवात होते. मागील आठवड्यात वादळ व पावसामुळे भात पेरणीस उशीर झाला आहे.तसेच उन्हाळी पीक काढणी खोळंबली. यातच गेली चार दिवस पावसाने उसंत दिल्याने मडिलगे परिसरातील शेतकरी भात पेरणीच्या कामात गुंतला आहे. यावेळी मडिलगे परिसर व सर्वत्र भात पीक पेरणीच्या कामास सुरुवात झाल्याने गावातील माणसांनी शेती शिवार फुलून गेला आहे.
0 Comments