शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा विरोधी राजर्षी शाहू विकास आघाडी ला गोकुळ दूध संघात पाठिंबा
बाळासाहेब बोडके (भुदरगड प्रतिनिधी)
आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय शुक्रवारी सकाळी गारगोटी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला.
विरोधी आघाडीत त्यांना किती जागा मिळणार हे स्पष्ट झालेले नाही. परंतू तरीही त्यांनी नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे यांच्यासाठी आग्रह धरल्याचे सांगण्यात येते. त्यांना गोकुळमध्ये एक जागा देवून जिल्हा परिषदेत आबिटकर गटाच्या वंदना जाधव यांना सत्तेत संधी द्यावी असाही प्रस्ताव आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आमदार आबिटकर यांनी पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला. लोकमतने दोन दिवसांपूर्वीच आबिटकर हे विरोधी आघाडीसोबतच राहतील असे वृत्त दिले होते.
आबिटकर गटाला दोन्ही आघाड्यांकडून पायघड्या घालण्यात आल्या होत्या. या गटाला मानणारा राधानगरी व भुदरगड तालुक्यात ठरावधारक वर्ग आहे. त्यांच्याकडे सुमारे दीडशे ठराव असल्याचा दावा केला जातो. त्यामुळेही या गटाच्या भूमिकेला महत्त्व आले. गेल्या निवडणूकीत हा गट विरोधी आघाडीसोबतच होता. परंतू विधानसभेला काँग्रेसचे आमदार व गोकुळच्या सत्तारुढ आघाडीचे नेते पी.एन.पाटील यांची मदत झाल्याने आबिटकर यांच्यापुढे खासदार संजय मंडलिक की आमदार पी. एन. पाटील यांपैकी कुणासोबत जायचे, असे धर्मसंकट उभे राहिले होते.
0 Comments