Ticker

6/recent/ticker-posts

नागेश पाटील बेले यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

नागेश पाटील यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

सुनिल पाटील,
राधानगरी लाईव्ह

यमन रागातील भावपूर्ण आलापातुन सायंकालीन रागानुकूल वातावरण निर्मिती आणि अत्यंत परिणामकारकतेने रागस्वरूप उलगडत जाणारी गायकी रसिकांना अनुभवता आली. बेले येथील प्रतिभावान युवा गायक नागेश पाटील यांनी रसिकांना आपल्या गायकीतून मंत्रमुग्ध केले.कुकूडवाडी येथे संत बाळुमामा पालखी सोहळ्याच्या निमित्ताने या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

नागेश पाटील यांनी प्रारंभी यमन रागातील 'हरी जय जय राम' हा अभंग अत्यंत भावपूर्णरीत्या सादर केला. धीरगंभीर आवाज, भरजरी स्वर, खर्जातील वजनदार सूर व विलक्षण भावमधुरता ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होती. उपजत प्रतिभा, ज्येष्ठांचे मार्गदर्शन व रियाजातून गायकी आपल्या अभ्यासातून कल्पकतेने सजवणाऱ्या नागेश पाटील यांनी श्रोत्यांना मोहून टाकले. रागस्वरूप खुलवताना सहजसुंदर नजाकतींनी, हरकतींनी त्यांनी श्रोत्यांना अनोखा आनंद दिला.'सुर निरागस हो' ही लोकप्रिय रचना त्यांनी लालित्यपूर्ण शैलीने सादर केली.

लता मंगेशकर यांच्या गाजलेल्या अवघा रंग एक झाला या रचनेने कार्यक्रमाची सांगता झाली. अभिजित पाटील सडोलीकर यांनी तबल्यावर केलेल्या दमदार साथीमुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. त्यांची साथही रसिकांची दाद मिळवून गेली.

Post a Comment

0 Comments