कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत हा लोकशाही तत्त्वप्रणाली प्रमाणे चालणारा देश असून भारतीय संविधानाचा आधार घेऊन या देशातील लोकशाही वाटचाल करत असते. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचीही जबाबदारी तेवढीच मोठी असते. या पार्श्वभूमीवर एखादी निवडणूक बिनविरोध होणे स्वाभाविक असले तरी सरसकट बिनविरोधाची भाषा केली जात असेल तर त्या प्रक्रियेला व सत्ताधाऱ्यांना रोखणे विरोधी पक्षाचे कर्तव्य असते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे याला कोल्हापुरातील भाजपचं जबाबदार आहे असे प्रतिपादन सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटचे अनिल म्हमाने यांनी केले. कोल्हापूर विकास आघाडीच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, कोल्हापूर उत्तर मतदार संघातील निवडणूक जर बिनविरोध झाली तर त्याला भाजपाच जबाबदार असेल. फुले, शाहू, आंबेडकरवादी व परिवर्तनवादी पक्ष, संघटनांची विचारविनिमय करण्यासाठी निवडक प्रतिनिधींचा रविवार दि. 6 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी 4:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कॉन्फरन्स हॉल, कोल्हापूर येथे संवाद मेळावा आयोजित केला होता.
संवाद मेळाव्याचे अध्यक्ष सत्यशोधक इतिहास परिषदचे प्रमुख डॉ. कपिल राजहंस म्हणाले, लोकशाहीची मूल्ये विस्कळीत होऊ नयेत, धनदांडग्याची मनमानी थांबावी, सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे ही भूमिका घेऊन सामान्य जनतेच्या बाजूचे राजकारण उभे करण्यासाठी त्यांच्या बाजूचा उमेदवार कोल्हापूर उत्तर मतदार संघात उभा करणे गरजेचे आहे. कोल्हापूर विकास आघाडी तसा उमेदवार उभे करेल.
संवाद मेळाव्याचे निमंत्रक लोकराज्य जनता पार्टीचे प्रमुख अनिल चव्हाण म्हणाले, वास्तविक एखाद्या मतदार संघातून निवडून आलेल्या प्रतिनिधींचे निधन होणे ही दुःखाचीच गोष्ट आहे. असे असले तरी त्या दुःखाचे व भावनेचे भांडवल करून लोकशाही तत्व प्रणालीवर गदा आणणे योग्य होणार नाही. लोकशाही बळकटीकरणासाठी ही धोक्याची घंटा आहे. निधनाचा भावनिक विषय करून घराणेशाहीला प्रोत्साहन देणे लोकशाहीसाठी घातक आहे. अशावेळी वारसांनाच पुढे आणण्याची नवी प्रथा निर्माण होईल.
संवाद मेळाव्यास डी. वाय. कदम, पी. के. पाटील, डॉ. सुनील पाटील, डॉ. दयानंद ठाणेकर, चंद्रनील सावंत, संतोष बिसुरे, अशोक तोरसे, गोरक्ष पाटील, किशोर सातपुते, अमोल कुरणे, संदीप कांबळे, रोहित चांदणे, ऍड. अकबर मकानदार, सिध्दार्थ कांबळे, अमोल कांबळे, शशिकांत जाधव, देवेंद्र पटेकरी, सिताराम कारंडे, सुरेश जाधव, हिंदुराव पोवार आदी विविध पक्ष, संघटना व संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.
संवाद मेळाव्याचे आभार डॉ. दयानंद ठाणेकर यांनी मानले तर सूत्रसंचालन सिध्दार्थ कांबळे यांनी केले.
0 Comments