Ticker

6/recent/ticker-posts

#पुरस्कार_की_तिरस्कार..???

 #पुरस्कार_की_तिरस्कार..???



मी एक नवलेखिका. लेखिका म्हणण्यापेक्षा मी एक खेड्यातली गृहीणी आहे.. फावल्या वेळी लिखाण व वाचन हा माझा आवडता छंद.. मला चार लोकांत अथवा व्यासपीठावर फारस व्यक्त होता येत नाही, जितकं लेखणीतून व्यक्त होता येत.. 

    लिखाणाच्या छंदातून मी एप्रिल मध्ये माझं एक पुस्तकही प्रकाशित केलं.. 

      माझा मित्रपरिवार, नातेवाईकांना याच खुप कौतुक ही आहे.. तशी वेगळ्या अशा पुरस्काराचा हाव कधीच नव्हती. आणि नसणार आहे.. 

     मी माझ्या चाकोरीत असल्यानं मला पुरस्कार, साहित्य संमेलन, कवी कट्टा कसा असतो? असे अनेक प्रश्न मनात होते.. कधी मला पहायला मिळेल का असे कार्यक्रम? आपल्याही मोठ्या लेखकांशी ओळखी होतील का..? असे वाटायचे. 

    मागच्या काही दिवसात एक अॅड आली.. पुरस्कारासाठी पुस्तक पाठवा.. हे अस काही असत हे मला याच वर्षात समजलं होतं... मी पुस्तक पाठवलं. 

      त्यानंतर 10 डिसेंबरला मला माझ्या एका लेखक मित्राने मेसेज केला, "अभिनंदन ताई आपल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला.. "

        मला किती आनंद झाला हे तुम्ही ओळखलं असेलच.. त्यानंतर आणखी एक मेसेज आला की, हा कार्यक्रम माझ्या सासरवाडीत गारगोटीत होतोय.. मी एका पायावर तयार झाले.. आणि हा पुरस्कार घ्यायला जायच असा निश्चय केला... 

       पण मी त्यांना एक प्रश्न फिरुन केला.. हे मेसेज मला वैयक्तिक का आले नाहीत? तुम्हाला कसे आले..? 

    ते बोलले की, "मला ही वैयक्तिक आले नाहीत.. यांचा एक whatsup ग्रुप आहे तिथं आलेत.. तुमच नाव वाचून मी तुम्हाला पाठवलं आहे.."

      मी फ़ारसा मानपानाचा विचार न करता कार्यक्रमाला जायचं अस ठरवल व आयोजकांचा नंबर सेव्ह केला. 

   त्याआमंत्रण

पत्रिकेचा एक स्क्रीन शॉट मारुन स्टेटसला ठेवला.. 

       अर्थात मी साहित्य क्षेत्रात नवखी असल्याने माझ्या गारगोटी व इतर विभागातील किती तरी साहित्य क्षेत्रातील लोकांनी मला 'जाऊ नकोस'.. इतकाच सल्ला दिला.. एकांनी तर चक्क 'पुरस्कार नाकारा' असा ही सल्ला दिला..  

     आदल्या रात्री मला असे समजले की, आयोजक लोकांना सांगत आहेत की, पुरस्काराची जाहिरात व पेपरला नाव देऊन आपल नाव महाराष्ट्र भर करतो. त्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे. पण मला वैयक्तिक पैसे द्या असा मेसेज आला नव्हता. म्हणूनही मी गेले कदाचित.. 

      तसेच गारगोटीतील काही नावाजलेले साहित्यिक हजर रहाणार नाही आहेत असं ही समजलं.

   तितक्यात त्याच लेखक बंधुने मला आणखी एक मेसेज पाठवला की, आपलं नाव कविता सादरीकरणासाठी निवडल आहे.. मी तत्काळ आयोजकांना मेसेज केला की, आपण मला गौरव दिलात त्या बद्दल आपली आभारी आहे.. मी सन्मान घेईन.. पण कविता सादर करु शकत नाही कारण मी कवी नाही.. त्यांनी पटकन मला व्हाॅटस अप कॉल केला.. व ओरडले.. 

  "अहो मैडम असा कुणाला कधी कॉल करतात का..?? आम्ही नाही दखल घेतली आपल्या मेसेजची तर काय करणार.. ?" 

   मी घाबरले मला वाटलं मी यांना डिस्टर्ब केल की काय? कार्यक्रमाच्या आयोजनात बिझी असतील त्यामुळे अस झाल असेल अस म्हणून मी सोडून दिलं..  

   नंतर निर्लज्जा सारखं मी पुन्हा त्यांना मेसेज केला की, आपण मला पुरस्कार दिलात हे ही मला ठाऊक नाही, मी कविता सादर करणार आहे हे ही मला ठाऊक नाही,कार्यक्रम कुठे व कधी आहे हे ही मला ठाऊक नाही.., आपल्या बातम्यांमध्ये माझ नाव फिरतय याची मला पुसटशी कल्पना देखील नाही. हे मला इतर लोकांकडून कळतय त्यापेक्षा 

 तुमच्या ग्रुप वर तरी मला अॅड करा.. मग माझ्यावर उपकार करत त्यांनी मला ग्रुपवर अॅड केल..  

       ग्रुप वर पाहिलं तर काही लोकांना छोट्या छोट्या कारणाने रिमूव्ह केल जात होतं.. काही स्वतः बाहेर पडत होते. इथे येऊन चुक केली की काय अस वाटू लागलं.. बाहेर पडाव तर जो बाहेर पडेल त्यांच नाव घेऊन आयोजक आभार मानत होते.. ( एक प्रकारे आडून अपमान,शालूतून जोडे हाणत होते) म्हणून मी बाहेर ही पडले नाही.  

    दुसऱ्या दिवशी मी 11 वाजेपर्यंत घरीच होते. जाऊ की नको या संभ्रमात.. माझे मुंबईचे एक लेखक मित्र आलेत त्यांना भेटता येईल, बाकीचे ओळखीचे लेखक व कवी भेटतील. कवी कट्टा कसा असतो व कविता कशी सादर करतात हे पहाता येईल व असे कार्यक्रम कसे होतात बघता येइल.. या नाविन्यापोटी मी कार्यक्रमास गेले. 

        मुख्य म्हणजे हा कार्यक्रम माझ्या घरापासून फक्त 4 किमी अंतरावर होता. इतक्या लांबून लोक येणार आहेत तर आपणं का जाऊ नये असा विचार करत.. साऱ्या हितचिंतकांनी दिलेल्या सल्ल्याला न जुमानता मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या साहित्यिक कार्यक्रमास गेले.. 

    मला जायला 12 वाजले असतील. मी तिथेच बॅक साइडला बसले.. गारगोटीतील आम्ही चार ते पाचच साहित्यिक हजर असू.. ते ही पुस्तक पाठवलेले असल्यानेच गौरव मुर्ती म्हणून.. 

    गौरव मुर्तीनी आपले नाव समोर जाऊन द्या.. अस माईक वर बोलल्यावर, मी हजर आहे हे सांगायला मी तिथे गेले.. ते बोलले परिचय पत्र द्या.. मी परत आले.. परिचय पत्र लिहिल व देऊन आले.. माझ्या बरोबर पुस्तक पुरस्कार पात्र काही लेखक /लेखिकासुद्धा होते.. 

   सारे पुरस्कार जाहीर झाले.. कार्यक्रम समाप्त झाला तरी मी सौ. अश्विनी व्हरकट, चंदगडचे एक लेखक संजय साबळे व मुंबईचे अवधूत शेलार एक अशा तिघांना साधं सट्रीफीकेट ही दिल नव्हतं की कसलासा पुरस्कार..!

      माझे मिस्टर त्यांना त्याबाबत जाऊन बोलले तर ते माझ्या मिस्टरांना एकदम रागात बोलले.. 

"अहो ही काय वेळ आहे का येण्याची.. आपल्या सोयीनुसार येता आणि वर येऊन आम्हाला विचारता.. "

माझे मिस्टर नम्रपणे बोलले.. 

"अहो आम्ही खुप वेळ झालं आलो आहोत.. "


"मग नाव का दिला नाही" आयोजक.


 "अहो एकदा माझी मिसेस नाव देऊन गेली. परिचय पत्र मागितला ते ही देऊन गेली. आणखी काय ?" तरीही ते दाद देईनात.. 

 शेवटी आम्ही तिघांनी आपली नावे लिहून त्यांच्याकडे देऊन आलो.. मी अक्षरशः रडवेली झाले होते. एक प्रकारचा अपमान..! मनात राग होता पण व्यक्त केला तर नवोदित व खेड्यातील एक गृहिणी, ग्रामीण लेखिका आहे असं आपल हासं होईल म्हणून मी शांत होते.. काही ठिकाणी ते खुप चांगले ही वागत होते.. अस का या प्रश्नाच उत्तर त्यांना च माहिती.. 

   पण त्यांनी असा अपमान करायला नको होता. ते लेखक लोकांशी पन्गा घेत आहेत. याची किंमत तर त्यांना मोजावी लागणारच होती. 

   एक तर आम्हाला न कल्पना देता आमची नावे बातम्यांना दिली होती. या कार्यक्रमास उपस्थित साहित्यिक म्हणून गारगोटीतील अनेक मोठ-मोठ्या साहित्यिकांची नावे त्यांनी छापली होती. नंतर समजलं की त्यातील कुणालाही त्याची लेशमात्र कल्पनाच नव्हती. 

       " पुरस्कार दिला तर दिला नाहीतर तेल लावत गेला.. " अशा रागातच मी मिस्टरांजवळ बोलले. 

    शेवटी मात्र त्यानी आम्हाला एक सट्रीफीकेट दिले. मुंम्बई च्या लेखक बंधुला तर फोटो काढण्यापुरता पुरस्कार दिला..आणि गंमत म्हणजे परत मागून घेतला.. याला काय अर्थ...आहे का..? 

      झेपत नाही तर कशाला करावं.. लेखक काही तुमच्या दाराला आला नव्हता आमचा सत्कार करा म्हणून.. तुम्ही आमंत्रण केल होत म्हणून ते आले होते..मुंबई, सिंधूदुर्ग, सातारा, जालना ,बारामती, गोवा अशा ठिकाणांहून लेखक आले होते.. त्यांची साधी विचारपुस ही केली नाही.. चहापाणी नाश्ता जेवण या लांबच्या गोष्टी..

      चहा नाश्त्याला आमच्या गारगोटीत काही कमी नाही ओ. सार भेटत.. पण लेखकांना जो सन्मान द्यायला हवा होता तो कुठल्याच लेखकाला मिळाला नाही. याची खंत वाटते.. त्याबद्दल माझा भुदरगड किंवा इथला कोणी साहित्यिक नक्कीच जबाबदार नाही..  

     एक साताऱ्याची लेखिका मैत्रीण ,व एक मुंबईचे लेखक मित्र व आम्ही भुदरगडचे चार पाच असे एका हॉटेलमध्ये गेलो.. आणि नाश्ता केला. 

      मला चिडलेली बघून माझे मिस्टर बोलले.. 

 "तू शांत हो.. घरात जाऊन तो कागद बंबात घाल.. पण बाहेरची लोक सोबत आहेत शांत रहा.. " पण आज फेसबुकवर डॉ. स्वाती आनंद यांची पोस्ट वाचली व मला ही माझा अनुभव शेअर करावा वाटला.. 

  यापुढे जाऊन मी सर्व बाहेरुन आलेल्या लेखक लोकांची मनापासून माफी मागते.. कारण या घटनेमुळे माझ्या भुदरगडला कुठे काळा डाग लागू नये ही इच्छा.. कारण स्थानिक साहित्यिकांचा व या संमेलनाचा काहीही संबंध नव्हता.. फक्त त्यांना काहीही कल्पना न देता .. वैयक्तिक आमंत्रणे न देता यात त्यांची नावे गोवली होती.. याची मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.... कोण कुठून बाहेरुन येतात व गारगोटीत असा प्रकार करतात.. याची खरंच लाज वाटते.. 

  राहीली गोष्ट पाहुणचार, चहापाणी, आदरातिथ्य तर त्याबाबतीत आमचे कोल्हापुर कधीच मागे नसते.. हा जो काही प्रकार घडला यामध्ये सर्वस्वी चुक आयोजकांची आहे.. तरीही कोल्हापुरच्या भुदरगड गावची एक नवोदित लेखिका म्हणून मी बाहेरुन आलेल्या सर्व साहित्यिकांची माफी मागते.. दिलगिरी व्यक्त करते.

       मी पैसे देऊन पुरस्कार स्विकारला नसला तरी ( तिथ उपस्थीत कुठल्याच लेखकाकडे पैसे नाही मागितले हे ही त्रिवार सत्य ) अपमान करुन घेऊन याची किमंत चुकती केली, अगदी सर्वांनी... त्याची मनापासून खंत वाटते म्हणून हा लेखनप्रपंच केला आहे. असो.. अनुभवातून अक्कल आली.. विकतचा अनुभव घेतला म्हणून विसरून जाऊ.

         धन्यवाद.

         _अश्विनी सावंत_व्हरकट_

                    गारगोटी.

Post a Comment

0 Comments