पृथ्वीची नेमकी पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा कोणती हे निरीक्षण करून ठरवायचं असेल तर दरवर्षी 21 किंवा 22 मार्च आणि 22 किंवा 23 सप्टेंबर या दोन तारखांना सूर्योदयाचे आणि सूर्यास्त चे निरीक्षण करावे , प्रत्येक सप्टेंबर महिन्यातील 22 किंवा 23 तारखेची अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना म्हणजे "विषुवदिन". या वर्षी गुरुवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी विषुव दिन आहे. या दिवसाला " शरद संपात दिन (Autumnal equinox) " किंवा September equinox असेही म्हणतात. या दिवशी आकाशात सूर्य विषुववृत्ताच्या नेमका *वैषुविक वृत्तात* दिसतो. म्हणजेच दुपारी ठीक साडे बारा वाजता विषुववृत्तावर उभारलेल्या माणसाच्या नेमका डोक्यावर सूर्य असणार, म्हणून या दिवसाला *विषुवदिन* असे म्हणतात. या दिवसाची खास वैशिष्ट्ये म्हणजे, हा दिवस व रात्र समान कालावधीचे, १२/१२ तासांचे असतात. येथे सूर्य बरोब्बर पूर्वेला (due east) उगवताना व बरोब्बर पश्चिमेला (due west) मावळताना दिसतो. या दिवशी विषुववृत्तावर राहणाऱ्या सर्व लोकांसाठी हा दिवस शून्य सावलीचा असणार आहे सदर दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर समान प्रमाणात व कोनात पोहोचतात, त्यामुळे या दिवशी संपूर्ण पृथ्वी सूर्य प्रकाशात उजळून निघते. येथून पुढे सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. याच दिवशी उत्तर गोलार्धात शरद ऋतूस प्रारंभ होतो.
आपल्या पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवतीच्या भ्रमण कक्षेच्या प्रतलाशी लंबरुप नसुन, २३.५ अंशांनी कललेला आहे. त्यामुळे सूर्याचा आकाशातील भासमान भ्रमण मार्ग (आयनिक वृत्त Ecliptic) आणि वैषुविक वृत्त (Equator) यांच्यामध्ये २३.५ अंशाचा कोन तयार होतो. ही दोन वृत्ते एकमेकांस १८० अंशावरील दोन बिंदूंत छेदतात. या बिंदुंना संपात बिंदू (equinox) म्हणतात. ज्या बिंदूत सूर्य आल्यावर उत्तर गोलार्धात प्रवेश करतो त्या बिंदूला " वसंत संपात बिंदू (Vernal Equinox)" म्हणतात . येथे सूर्य २०/२१ मार्च रोजी असतो म्हणून यास March Equinox देखील म्हणतात. तसेच ज्या बिंदूत आल्यावर सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो त्यास "शरद संपात बिंदू (Autumnal Equinox )" म्हणतात . येथे सूर्य २२/२३ सप्टेंबर रोजी असतो म्हणून यास September Equinox असेही म्हटले जाते.
या संपात बिंदूंवर असताना, वर्षातील फक्त दोनच दिवस सूर्य वैषुविक वृत्तावर असतो. त्या दिवसांना *"विषुव दिन* " म्हणून ओळखतात . बाकीचे सहा सहा महिने सूर्य उत्तर व दक्षिण गोलार्धात भ्रमण करताना दिसतो , यालाच आपण सूर्याचे " *उत्तरायण -दक्षिणायन* " असे म्हणत असतो.
शरद संपात बिंदूत आल्यावर सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. त्यामुळे उत्तर गोलार्धात दिनमान कमी, तर रात्र मोठी होत जाते. आणि तिकडे शरद ऋतु चालू होतो. हळूहळू थंडी वाढु लागते. दक्षिण गोलार्धात मात्र याच्या उलट परिस्थिती असते. तिकडे दिवस मोठा व रात्र लहान होऊ लागते. परिणामी दक्षिण गोलार्धात उन्हाळा सुरू होतो.
२१ डिसेंबर नंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो. २१ मार्चला तो पुन्हा वैषुविक वृत्तावर वसंत संपात बिंदूवर येतो. आणि उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. तेंव्हा उत्तर गोलार्धात वसंत ऋतूस प्रारंभ होतो.
अशा प्रकारे पृथ्वीचा अक्ष कललेला असल्यामुळे , आपण एकाच वेळी भूतलावर, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ऋतु अनुभवतो. जैव-विविधता व सृष्टी संवर्धनासाठी विषुव दिन , आयन दिन , सुर्याचे उत्तरायण -दक्षिणायन या भू- खगोलीय घटना अत्यंत महत्वाच्या आहेत. तरी 23 सप्टेंबर रोजी सर्वांनी आपल्या निरीक्षण स्थळावरून पृथ्वीची नेमकी पूर्व आणि नेमकी पश्चिम दिशा त्यादिवशी निरीक्षण करून हेरून ठेवावी,
-- किरण गवळी, खगोल अभ्यासक, कोल्हापूर 9922666111
0 Comments