कोल्हापूर दि. 26 मे/2021
तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा बौद्ध धम्म हाच खरा भारताचा चेहरा आहे, परंतु स्वतःचा चेहरा हरवलेला समाज म्हणजे बहुजन समाज आहे. असे प्रतिपादन प्रा. प्रबुद्ध साठे यांनी केले.
तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या 2565 व्या जयंती निमित्ताने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कोल्हापूर च्या वतीने ऑनलाईन व्याख्यानांमध्ये प्रा. साठे बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे होते.
यावेळी बोलताना प्रा. साठे म्हणाले की, बहुजनांना मुक्ती मिळवायची असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. 85% समाज बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचा लाभार्थी आहे. बहुजनांनी बुद्ध धर्म स्वीकारणे म्हणजे धर्मांतर नसून घरवापसी आहे.
यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व पाहुण्यांची ओळख करुन दिली.
अध्यक्षीय समारोपा मध्ये बोलताना प्रा. शहाजी कांबळे म्हणाले की, भारत देशामध्ये बुद्ध वजा करून बहुजनांची प्रगती होणार नाही. आणि बुद्ध वगळून आंबेडकरवाद सांगता येणार नाही. बौद्ध धम्म वगळून आंबेडकरवाद सांगणे ही बौद्धिक बदमाशीगिरी आहे. त्यामुळे धम्मक्रांती साठी बौद्ध व बहुजनांनी परिवर्तनाची लाट निर्माण करणे आवश्यक आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपाताई वायदंडे यांनी स्त्रियांच्या प्रगतीमध्ये बौद्ध धम्माचा मोठा वाटा असून, आईच्या मांडीवरच बाळाला समतेचा, ममतेचा पहिला धम्म धडा मिळाला पाहिजे असे सांगितले व आभार मानले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दगडू भास्कर, प्रा. रामेश्वर कांबळे, अॅड. भीमसेन कांबळे, जयसिंग कांबळे, रिपाइं गडहिंग्लज तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे, संजय लोखंडे, प्राजक्ता वाटे, जयश्री कांबळे, लक्ष्मण मोहिते, अतुल सडोलीकर, योगेश माटे यांच्यासह अनेक जण ऑनलाइन व्याख्यानांमध्ये सहभागी झाले होते.
बुद्धगार्डन शास्त्री नगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, रूपाताई वायदंडे, दत्ता मिसाळ, गुणवंत नागटिळे, राहुल कांबळे, प्रदीप मस्के यांनी बुद्धवंदना करून प्रा. कांबळे यांनी उपस्थितांना बुद्धधम्माचे योगदान सांगितले व शासनाचे नियम पाळत मोठ्या उत्साहात बुद्धजयंती साजरी केली.

0 Comments