Ticker

6/recent/ticker-posts

खाजगी, मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये कोरोनाबाधित गरिबांसाठी 5% बेड आरक्षित करा! ... प्रा. शहाजी कांबळे.

*खाजगी, मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये कोरोनाबाधित गरिबांसाठी 5% बेड आरक्षित करा! ... प्रा. शहाजी कांबळे*
*खाजगी दवाखान्यांच्या तुलनेत सरकारी दवाखान्यातील कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक.*

*कोल्हापूर दि. 13 मे/*
        खाजगी दवाखान्याच्या तुलनेत शासकिय, सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे ही बाब चिंतेची असून मानवतावादी दृष्टिकोनातून खाजगी हॉस्पिटल्सनी, कोरोना पॉझिटिव्ह गरीब रुग्णांच्या साठी 5% टक्के बेड आरक्षित ठेवावेत अशी मागणी आज निवेदनाद्वारे रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी जिल्हाप्रशासनाकडे केली. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना भेटले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे सर, जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपाताई वायदंडे व कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांनी केले.
       कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि मृत्यूचे प्रमाणही आटोक्यात येताना दिसत नाही, ही खूप चिंतेची बाब आहे अशातच शासकीय, सार्वजनिक रुग्णालयांमधील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण हे खाजगी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तुलनेत फार मोठे आहे ही बाब गंभीर स्वरूपाची असून, गरीब कोरोनाग्रस्तांनाहि जगण्याचा समान अधिकार आहे. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने खाजगी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे पॅकेज भरून न शकणाऱ्या गरिबांना मृत्यू पत्करावा लागत आहे. खाजगी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये  गरीब कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी 5% बेड आरक्षित ठेवावेत व याच्यासाठी खाजगी हॉस्पिटल प्रशासनाने सहकार्य करणे करिता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा आणि गरीब कोरोना ग्रस्तांना तातडीने उपचार देऊन कोरणा मुक्त करावे अशी मागणी आज प्रा. कांबळे यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले कि, सध्या जिल्ह्यात वाढत्या रुग्ण संख्येच्या प्रमाणात आवश्यक असणारे ऑक्सिजन, रेमीडीसेवर इंजेक्शन्स, कोव्हीड सेंटर्स, हॉस्पिटल, तज्ञ मेडिकल स्टाफ कर्मचाऱी यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. म्हणून प्रशासनाने राज्य व केंद्र शास्त्राकडे संयुक्त प्रयत्न करून कोल्हापूरच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे अशीहि मागणी यावेळी करण्यात आली.
         दिनांक 18 एप्रिल 2021 रोजी कसबा बावडा येथील घनकचरा प्रकल्पावर झालेल्या दुर्घटनेची प्रशासनास आठवण करुन देत प्रा. शहाजी कांबळे सर म्हणाले की, कसबा बावडा घनकचरा प्रकल्पावरील कचरा वेचक महिला श्रीमंती मंगला राजेश दवणे यांचा पोकलँड मशीन ने 18 एप्रिल 2021 रोजी शिरच्छेद झाला. यासंदर्भात खुनाचा गुन्हा नोंद न करता अपघात दाखवण्याचा खोडसाळपणा महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून होत आहे. मृत मंगला दावणे मृत्यूप्रकरणी कलम 302 अन्वये गुन्हा नोंदवावा. ठेकेदारास व पोकलॅंड मालकांस जबाबदार धरावे. चालकाचा परवाना, मशिनरी कागदपत्रे, ठेका नियुक्ती संदर्भातील कागदपत्रे न तपासताच गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी उपायुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांनी दिलेला अहवाल रद्द करून स्वतंत्र रीत्या चौकशी करावी आणि कचरावेचक दुर्दैवी मंगला दावणे यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे या कुटुंबास 25 लाख रुपये मदत घेऊन कुटुंबातील व्यक्तीस नगरपालिकेत सेवेत घ्यावे अशी मागण यावेळी करण्यात आली. 
        जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटल मधील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये शॉर्टसर्किटने  लागलेल्या भीषण आगीत तीन कोरोना बाधितांचा मृत्यू होऊन 4 सुरक्षारक्षकां सह पाच जण जखमी झाल्याची घटना घडून बरेच दिवस झाले तरी यांना न्याय न मिळाल्याचे यावेळेस जिल्हा प्रशासनाकडे नमूद केले. या मृतांमध्ये  बानगे तालुका कागल येथील मुक्ताबाई विश्वास पाटील, नागरदळे तालुका चंदगड येथील विजयकुमार रामचंद्र कांबळे, सिद्धार्थनगर कोल्हापूर येथील बाबासाहेब श्रीपती भोजे यांच्या नातेवाईकांना अद्याप कोणतीही भरपाईची रक्कम मिळाली नाही, त्यामुळे शासनाने या कुटुंबीयांना नाशिक गॅसगळती प्रमाणे भरपाई द्यावी अशी  मागणी उत्तम दादा कांबळे यांनी केली.
      लॉकडाउनच्या अंमलबजावणीतील विसंगती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत असताना पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपाताई वायदंडे यांनी उद्योगधंदे व्यवहार ठप्प असले तरीसुद्धा मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकांची वसुली बेदरकारपणे आजही चालू आहे. तरी लॉकडाऊन काळात कोणत्याही प्रकारची कर्ज वसुली होऊ नये. जनतेला अपमानित करून आत्महत्येस प्रवृत्त करू नये असे आदेश मायक्रोफायनान्स कंपन्या, बँका आणि शासकीय कार्यालयांना द्यावेत असे सांगितले. तसेच लॉकडाऊन वाढवत असताना सामान्य माणसाच्या पोटाचा प्रश्न  पहिल्यांदा सोडवावा. शासनाने आपल्या सोयीने आणि सवडीने लॅाकडाऊनचा निर्णय न घेता गोरगरीब व सामान्य जनतेची भूक आणि उपासमार लक्षात घेऊन कष्टकरी, हातावरचे पोट असणारे व वेठबिगारी यांना शासनाने मोफत धान्य व प्रतिमहा पाच हजार रुपये द्यावेत असे सौ. वायदंडे म्हणाल्या.
       कामगार आघाडीचे गुणवंत नागटिळे यांनी असंघटित कामगारांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडताना नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पंधराशे रुपये मिळाल्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले. परंतु कोरोना काळामुळे नोंदणी करण्यास असमर्थ ठरलेल्या बांधकाम कामगारांनाही पंधराशे रुपये मिळण्याबाबत ची भूमिका सरकार कडे कळवावी अशी बाजू जिल्हा प्रशासनासमोर मांडली.
       जिल्ह्याचे उपाध्यक्ष दत्ता मिसाळ यांनी कोरोना च्या पहिल्या लाटेत थकित असलेले वीजबिल भरण्यास असमर्थ असलेल्या सर्वसामान्यांनी आत्ता पुन्हा लॅाकडाऊन च्या धर्तीवर हे विज बिल कसे भरायचे? त्यामुळे लॅाकडाऊन काळातील गोरगरिबांचे वीज बिल माफ करावे अशी भूमिका मांडली.
      रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या या सर्व मागण्यांवर विस्तृतपणे चर्चा करून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी खाजगी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये गोरगरिबांना 5% बेड आरक्षीत करण्याबाबत मानवतावादी दृष्टिकोन ठेवण्यासाठी खाजगी हॉस्पिटल्स, डॉक्टर यांच्याशी लवकरच चर्चा करू आणि दिलासादायक मध्यम मार्ग काढू असे सांगितले.
     तसेच कचरावेचक मृत मंगला राजेश दावणे यांना मुख्यमंत्री सहाय्यता फंडातून पाच लाखाची मदत करण्याकरिता प्रयत्नशील राहून  अशा पद्धतीचा अहवाल महानगरपालिके कडून मागवून घेऊन त्याच्यावर निर्णय घेऊ असे सांगितले. त्याच बरोबर इतर मागण्यांसाठी राज्य शासनाकडे भूमिका पोहोचवून लवकरच त्यांची पूर्तता करण्या संदर्भात सकारात्मक  विचार करू असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
        शिष्टमंडळात पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे सर, जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपाताई वायदंडे, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, शहर कार्याध्यक्ष राहुल कांबळे, कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, कागल तालुका कार्याध्यक्ष बी. आर. कांबळे, प्रताप बाबर, भागवत माने आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments