कोल्हापूरमध्ये कोरोना संकटाबरोबर एक नवीन संकट उभं राहिलंय. एप्रिलच्या सुरवातीलाच पाणी टंचाई भेडासावू लागलीय.
राधानगरीतील मौजे मानेवाडी येथे पाणी टंचाईची भीषणता; घोटभर पाण्यासाठी महिलांची वणवण
एका बाजूला कोरोना संक्रमणाच संकट उभे आहे. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील काही भागात भीषण पाणी टंचाईच संकट आ वासून उभं ठाकलंय.राधानगरी तालुक्यातील मानेवाडी गावासह अन्य गावात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू असून अद्याप दोन महिने पाण्यावाचून कसे काढायचे असा प्रश्न लोकांना पडला आहे. गावात कुठेही पाणी मिळत नसल्याने ओहळाच्या काठी डबके खोदून त्यातील पाणी पिण्याची वेळ लोकांवर आली आहे.
राधानगरी तालुक्यातील कोते ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मानेवाडी येथे साधारण सातशे ते आठशे लोकसंख्या असून एप्रिल महिन्यापासून गावातील बोअरवेल व विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्यासाठी व दैनंदिन गरजेसाठी पाणी उपलब्ध नसल्याने गावाच्या शेजारी असलेल्या ओहळाच्या कडेला डबकी खोदून त्यातील पाणी पिण्याची वेळ लोकांवर आली आहे. या डबक्यातून उपलब्ध पाणीही इतक्या कुटुंबांची तहान भागवू शकत नसल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. तर या डबक्यातील पाणी अशुद्ध असून यातून काही आजार उद्भवण्याची शक्यता ग्रामस्थानी व्यक्त केली आहे.
गावात ९२ लाख रुपयांच्या पेयजल योजनेतून उभारलेली पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, ती अनेक वर्षांपासून बंद आहे, ज्याचे कोणतेही ठोस कारण कुणाकडेही नाही. गावात विहिरी असून पाण्याची पातळी खोल गेल्याने या गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याचे सर्व यंत्रणा सांगते. मात्र, कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी यासाठी एकतर बंद पाणीपुरवठा योजना सुरू करावी अन्यथा लघु पाणीपुरवठा योजना करण्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. कोरोनाचे संकट सर्वत्र पसरले असून संचारबंदीत कामधंदे व मजुरीही बंद आहे. एकीकडे उपासमारी तर दुसरीकडे पाण्याची चणचण अशा दुहेरी संकटाचा सामना मानेवाडीकर करीत आहेत.
मानेवाडी गावात उद्भवलेल्या पाणी टंचाईबाबत राधानगरी तहसीलदार या ठिकाणी प्रस्ताव पाठविला असून टँकर सुरू करण्याची मागणी आहे. गावातील पाण्याची पातळी अतिशय खोल असल्याने विहिरी व बोअरवेल असून नसल्यासारख्या होतात आणि याच कारणामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अडचणी निर्माण होतात, असे मत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा सचिव प्रकाश माने यांनी मांडले.
0 Comments